मारहाण करून दारूचा ट्रक पळविणाऱ्या टोळीतील मोक्कातील फरार आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ट्रक चालकाला मारहाण करून दारूचा ट्रक पळवून नेणाऱ्या आणि मोक्कातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली आहे. निलेश उर्फ काळ्या ग्यानबा भगत (वय २८, मु. पो. बहुली, गायकवाड वाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुणे जिल्ह्यातील खळद रोडवर दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी मुकेश अशोक कुमार गुप्ता (वय ३३, रा. अंबाडी पेट्रोल पंपाजवळ भिवंडी मुळ बिहार) यांचा ट्रक २२ मे २०१८ रोजी दुचाकी आडवी लावून अडवला. त्यानंतर त्यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तोंड टॉवेलने बांधून त्यांना वाकड येथे नेले. त्यानंतर ट्रकमधील इंपेरियल ब्लू कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचे ९२४ बक्स दोन मोबाईल, ट्रकसह असा ५५ लाख ३३ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यात मोक्काचा (संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कलमांचा अंतर्भाव करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी याआधी पप्पू उर्फ प्रकाश गायकवाड, दत्ता गायकवाड, अमित भगत, बंडा काशीद, तुषार विभुते या पाच जणांना अटक केली होती.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाकडून पाहिजे असलेल्या आणि फरार आरोपींचा शोध घेत असताना सहायक पोलीस फौजदार अनिल शिंदे व पोलीस हवालदार प्रविण तापकिर यांना माहिती मिळाली की, सासवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश उर्फ काळ्या भगत हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. दरम्यान तो शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यावर यापुर्वी २०११ मध्ये उत्तमनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर २०१६ मध्ये पिटा अक्ट नुसार गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट ३ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, सहायक पोलीस फौजदार अनिल शिंदे, कर्मचारी संतोष क्षीरसागर, प्रविण तापकिर, संदिप तळेकर, दत्तात्रय गरुड, किशोर शिंदे, राहूल घाडगे, संदिप राठोड यांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त