कुख्यात निल्या वाडकर खून प्रकरणी एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जनता वसाहतीतील निलेश वाडकर खून प्रकरणी फरार असलेल्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिपक शेंडी उर्फ दिपक दत्तात्रय खिरीड असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जानेवारी महिन्यात जनता वसाहत परिसरातील निलेश वाडकर याचा वर्चस्ववादातून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दिपक खिरीड हा फरार होता. दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस नाईक घोटकुले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिपक खिरीड हा गोऱ्हे बु. येथे सावली हॉटेल येथे त्याच्या कुटुंबियांना भेटणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने साध्या वेशात गोऱ्हे बु. येथे धाव घेतली. त्यांनी सावली हॉटेलजवळ सापळा रचला. दोन पथकं त्याच्या येण्याची वाट पाहात असताना दिपक खिरीड हा कोणाला ओळखू येणार नाही अशा पद्धतीने तोंड बांधून आला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पोलिसांना हुलकावणी देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने त्याला २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, कर्मचारी घोटकुले, यादव, गाढवे, सुर्वे, क्षीरसागर यांच्या पथकाने केली.