‘त्या’ फरार काँग्रेस आमदाराला अखेर अटक

बंगळूर : वृत्तसंस्था – कर्नाटकातील काँग्रेस आमदार आनंदसिंग यांच्या डोक्यात बाटली फोडून फरार झालेले काँग्रेसचे कंपली (जि. बळ्ळारी) येथील काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकातील इगलटन रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला होता. यानंतर आमदार जे एन गणेश हे फरार होते. त्यांना आज(दि.२०) गुजरात येथील सोमनाथ येथे अटक केली. उद्या त्यांना रामनगर येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. अटक केल्यानंतर त्यांना बंगळूर येथे आणण्यात आले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आमदार गणेश यांनी १९ जानेवारी रोजी आमदार आनंदसिंग यांना हाताने ठोसा मारून तसेच फ्लावरपॉट आणि बाटली फेकून मारहाण केली होती. भाजपच्या ऑपरेशन कमळची माहिती मुख्यमंत्र्यांना का कळवली, असा जाब विचारत आमदार गणेश यांनी वादाला सुरुवात केली. फ्लावरपॉट आणि बाटली फेकून मारल्याने आनंदसिंग जखमी होऊन त्यांच्या डोक्याच्या जखमेवर १२ टाके घालावे लागले होते. यानंतर आमदार गणेश यांंच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आमदार आनंदसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार जे. एन. गणेश यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ नुसार गणेश यांच्यावर एफआयआर नोंद झाले आहे. तसेच त्यांना फरार घोषित केले होते.

परंतु पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला होता. तब्बल १८ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक आमदार गणेश यांचा शोध घेत होते. पोलिसांच्या पथकाने मुंबई, गोवा, बेळ्ळारी आणि हैदराबाद अशा अनेक ठिकाणी गणेश यांचा शोध घेतला. आणि अखेर त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिस महानिरीक्षक बी. दयानंद यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आमदार गणेश हे कंप्लीचे आणि आनंदसिंग हे होसपेटचे आमदार आहेत. आमदार फोडू नयेत म्हणून काँग्रेस आणि भाजपने आपल्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते. याच दरम्यान दोन आमदारांनी रिसॉर्टमध्ये राडा केला होता. दरम्यान, रिसॉर्टमधील हाणामारी प्रकरणी आमदार गणेश यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.

You might also like