अबू जिंदालची कारागृहात देखील कारस्थाने संपेनात

नागपूर: पोलिसनामा ऑनलाईन

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला दहशतवादी अबू जिंदाल सध्या मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. पण तरीदेखील त्याची कारस्थाने मात्र थांबलेली नाहीत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील मास्टर माईंड अबू जिंदाल भारतीय कायद्याचा वापर करीत माहितीच्या अधिकाराच्या साहाय्याने राजकीय माहिती मिळवण्याच्या तयारीत असल्याचे समजले आहे. दहशतवादी कारवाईत थेट सहभाग असलेला अबू जिंदाल ला माहिती पुरवणे धोकादायक असल्याने सुरक्षेच्या कारणावरून त्याचे अपील फेटाळण्यात आले आहे.

अबू जिंदाल ने मागवली होती ही माहिती

अबू जिंदाल ने मुंबईतील कारागृहातुन बरीच माहिती मागवली होती. यात बीडच्या १९८० पासून म्हणजेच त्याच्या जन्मापासूनची निवडणूक माहितीचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे छोट्या छोट्या मोहल्ल्यातील अगदी नगर परिषद/ पालिका निवडणुकीत हरलेले, जिंकलेले अशा सर्व उमेदवारांची माहिती अबू जिंदालने मागितली आहे.पण गल्लोगल्लीची जुनी माहिती उपलब्ध नसल्याने त्याचा अर्ज फेटाळला आहे.

मात्र जिंदालने त्याला आव्हान दिले . पण राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी त्याचे अपिल देखील फेटाळले आहे. न्यायालयात दोषी सिद्ध झालेला, तसेच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दहशतवाद्याला माहिती देणे हे देशहिताच्यादृष्टीने योग्य नाही. त्यामुळे जुंदालला माहिती देत नसल्याचे माहिती आयुक्तांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे अबु जुंदालने माहिती मागवण्यासाठी 10 रुपयाची स्टॅम्प फी न भरता मी तुरुंगात असल्यामुळे मला दारिद्र्य रेषेखालील समजावे असे म्हटले आहे.