छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल पोलिसाने काढले अपशब्द, FIR ची मागणी

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –   छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्याने अपशब्द काढल्याने पालम शहरासह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसाच्या वादग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी पालम तहसील आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या घटनेनंतर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हा पोलीस कर्मचारी पालम पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. जगन्नाथ काळे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल शब्द वापरले. पोलीस कर्मचाऱ्याच्या आवाजातील ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. तसेच आपल्या मागणीसाठी शिवप्रेमींनी शहरातून मोर्चा काढला.

काय आहे प्रकरण ?

जगन्नाथ काळे याने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या बद्दल अश्लील शब्द वापरत, शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिपमधून उघडकीस आले आहे. सकाळपासून ही ऑडीओ क्लिप परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हाररल होत आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातूनच शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरत पालम शहर बंद करण्याची घोषणा केली. संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करुन प्रशासनाने नागरिकांच्या भावनांची दखल घ्यावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा शिवप्रेमींनी यावेळी दिला आहे. त्यांनी आपले निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

पोलिसांकडून शिवप्रेमींची समजूत काढण्यात येत आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र अद्याप या पोलीस कर्मचाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सध्या तरी शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like