पुणे विद्यापीठाच्या सिस्टीममधून विधी शाखेचा पेपर ‘गायब’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिस्टीमधून विधी शाखेच्या अंतिम वर्षांचा पेपर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने (ABVP) विद्यापीठा विरुद्ध ‘पुंगी वाजवा’ आंदोलन केले आहे.

विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता विद्यापीठ प्रशासनाकडे १४ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावरती काय उपाय काढणार याबद्दल विद्यापीठाने अजूनही उत्तर दिले नाही. बीए एलएलबी अभ्यासक्रमा बाबत विद्यापीठापूर्वी देण्यात येणारी बीएची पदवी मिळणार नाही, असे सांगण्यात आले. तद्वतच, इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरुन उत्तीर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे, असा प्रश्न ABVP ने उपस्थित केला.

ABVP च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात ‘पुंगी वाजवा’ आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कुलगुरू स्वतः येऊन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा पवित्रा ABVP च्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

कुलगुरूंना घातला घेराव

दरम्यान, ABVP च्या कार्यकर्त्यांना भेटण्यास आलेल्या कुलगुरू उमराणी यांना घेराव घालण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला.