… तर AC मुळं पसरला ‘कोरोना’ व्हायरस ? 3 कुटूंबातील 9 जणांना ‘लागण’ !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूने चीनच्या वुहान शहरातून थैमान घालण्यास सुरुवात केली होती. वुहानहून परतलेले एक कुटुंब ग्वांगझोउ येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. या कुटूंबाच्या सदस्यांपैकी एकाला कोरोनाची लक्षणे होती ज्याबद्दल त्याला स्वतःलाच माहित नव्हते. काही दिवसांनंतर या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणाऱ्या इतर नऊ जणांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली.

हा विषाणू एसीच्या माध्यमातून रेस्टॉरंटमध्ये पसरला आणि एकदुसऱ्यांच्या जवळ बसल्याने तीन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. या तिन्ही कुटुंबांचा एकमेकांशी काहीही संपर्क नव्हता. तथापि, रेस्टॉरंटमध्ये जेवण करणारे इतर 73 लोक आणि कर्मचाऱ्यांना विषाणूचा संसर्ग झाला नाही. चीनच्या रेस्टॉरंटमधून कोरोना पसरण्याचे वृत्त एका संशोधनातून समोर आले आहे.

एका वृत्तानुसार, चीनच्या सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) च्या संशोधन पेपर मध्ये तज्ञांनी याचा उल्लेख केला आहे. तज्ञांचा असा निष्कर्ष आहे की हे तिन्ही कुटुंब एकाच व्यक्तीपासून संक्रमित झाले आहेत, जो की ‘फॅमिली A’ चा सदस्य होता. संक्रमित रूग्णांच्या या कुटूंबाचे नाव चिनी तज्ञांनी ‘फॅमिली A’ असे ठेवले आहे, तर इतर दोन कुटुंबांचे नाव ‘फॅमिली B’ आणि ‘फॅमिली C’ ठेवले आहे.

24 जानेवारीला ‘फॅमिली A’ ने ग्वांगझोउमधील रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. एक दिवसानंतर त्या कुटुंबातील एका 63 वर्षीय वृद्ध महिलेला खोकला आणि तापाचा त्रास झाला आणि तिची कोरोना तपासणी सकारात्मक आली. अहवालानुसार, दोन आठवड्यांतच 24 जानेवारीला त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवणाऱ्या नऊ जणांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातील चार जण त्या वृद्ध महिलेचे नातेवाईक होते, तर इतर संक्रमित लोक ‘फॅमिली A’ च्या टेबलाच्या दोन्ही बाजूला बसले होते.

एकमेकांशी थेट संपर्क नसतानाही रेस्टॉरंटमध्ये ‘फॅमिली A’ च्या जवळ बसल्यामुळे या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचा निष्कर्ष चिनी तज्ञांनी काढला आहे. हे लोक सुमारे एक तास ‘फॅमिली A’ जवळ बसले होते. ‘फॅमिली C’ च्या टेबलाच्या वर ‘एसी’ बसविला होता, ज्याची हवा इतर तीन टेबलांकडे जात होती. जानेवारीमध्ये वुहानच्या पलीकडे कोरोना विषाणूचा प्रसार झाला नव्हता, त्यामुळे संशोधकांचा असा विश्वास आहे की वुहानच्या ‘फॅमिली A’ ने इतर दोन कुटुंबांमध्ये हा विषाणू पसरविला.

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार तज्ञांचा असा विश्वास आहे की अशी प्रकरणे घडल्यानंतर आणि साथीचा रोग संपल्यानंतर लोकांच्या बाहेर खाण्याच्या सवयीमध्ये बदल होईल. चीनमधील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की एसीच्या हवेतील ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून रेस्टॉरंटमध्ये हा विषाणू पसरतो, ज्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट एसीच्या एअरफ्लोची दिशा होती.