पुण्यात दिवसभरातील अ‍ॅन्टी करप्शनचा ३ रा ट्रॅप : सहाय्यक उपनिरीक्षकाला 20 हजार घेताना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलिस दलात आज (गुरूवारी) दोन अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप झाले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात 3 रा ट्रॅप झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शिक्रापुर येथे 3 रा ट्रॅप केला असुन शिक्रापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बाबुराव कोळेकर (54) यांना 20 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराविरूध्द कारवाई न करण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक कोळेकर यांनी लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रूपये लाच देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कोळेकर यांची तक्रार केली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक हे 20 हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गुरूवारी शिक्रापूर येथे सापळा रचला. त्यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बाबुराव कोळेकर यांनी सरकारी पंचासमक्ष 20 हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूध्द शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज (गुरूवारी) पुणे पोलिस आयुक्‍तालयातील आस्थापना शाखेतील वरिष्ठ लिपीक मनोज हरी काळे (52) यांना एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 3 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यापुर्वी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार निसार मेहमुद खान (44, बक्‍कल नं. 2647) आणि खासगी व्यक्‍ती मेहंदि अजगर शेख (32, रा. हडपसर) यांना एका महिला भंगार व्यावसायिकाकडून 5 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर शिक्रापूर येथे अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप झाल्याने संपुर्ण पुणे शहर आणि जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे.