सांगलीत 40 हजाराची लाच घेताना GST चे 2 अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगलीतील जीएसटीचे राज्यकर अधिकारी आणि कर सहाय्यक अशा दोघांना 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र खोत (वय 57), शिवाजी कांबळे (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली.

मूल्यवर्धित करातील त्रुटी दूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदारच्या पत्नीचा कवठेमहांकाळ येथे बसवेश्‍वर इंडस्ट्रीज नावाने फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखानाच्या मागील तीन वर्षाचा मूल्यवर्धित कर मार्च 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरलेला होता. सांगलीतील जीएसटी कार्यालयातील खोत आणि कांबळे यांनी तक्रारदाराना तुमच्या कारखान्याच्या मुल्य वर्धीत करात त्रुटी निघण्याची शक्‍यता आहे, असे फोनवरून सांगितले. तसेच तुम्ही एक लाख रूपये द्या, म्हणजे तुमच्या करामध्ये आम्ही त्रुटी काढणार नाही, असे म्हणून लाचेची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली. खोत यांच्या सांगण्यावरून कांबळे यांनी तक्रारदाराकडे 70 हजार रुपयांची मागणी केली. चर्चेअंती 60 हजार रूपये घेवून येण्यास सांगितल्याचे पडताळणी मध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटी कार्यालयात सापळा रचला. खोत यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम शिवाजी कांबळे याच्याकडे देण्यास सांगितले. शिवाजी कांबळे याने चाळीस हजार रूपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.