90000 ची मागणी, 30000 ची लाच घेणारा संस्थाचालक, वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदाराच्या सेवानिवृत्‍तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी 90 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्‍ता म्हणुन 30 हजार रूपये घेणार्‍या संस्थाचालकास आणि संस्थेतील वरिष्ठ लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (शुक्रवारी) सकाळी करण्यात आली आहे.

तीर्थदास सुखदेव अहिरे (57, हुद्दा : मुख्याध्यापक / सचिव /संस्था चालक – गांधी व फुले (तांत्रिक) विद्यालय, खेडे, ता.जि. धुळे) आणि अनिल नवल सोनवणे (48, हुद्दा : वरिष्ठ लिपिक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धुळयात राहणार्‍या 58 वर्षीय शिक्षकाने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार शिक्षकाचा सेवानिवृत्‍तीचा प्रस्ताव त्यांनी अनिल सोनवणे यांना सादर केला होता. त्यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालक अहिरे यांच्याशी भेटण्यास सांगितले. अहिरे यांनी तक्रारदारास सदरील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी 90 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती तिन टप्प्यात सोनवणे यांच्याकडे देण्यास सांगितली. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. शुक्रवारी सापळा रचला असता सरकारी पंचासमक्ष अहिरे यांच्या सांगण्यावरून सोनवणे यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर अहिरे आणि सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिस उपाधीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. एका संस्थाचालकासह वरिष्ठ लिपिकास 30 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने संपुर्ण जिल्हयात खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like