40 हजारांची लाच मागणारे दोन पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी अटक न करण्यासाठी पुणतांबा चौफुली येथे 40 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर रोजी ही मागणी केली होती. पडताळणीनंतर आज दुपारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर सुपेकर, विशाल मैद (दोघे नेमणूक : शिर्डी पोलीस स्टेशन, अहमदनगर, वर्ग 3) ही आरोपी पोलिसांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराचा भाऊ व त्यांचेकडे काम करणाऱ्या मुलाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी आरोपींनी पंचासमक्ष 22/11/19 रोजी 40 हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली होती.

सदर मागणीची पडताळणी केल्यानंतर आज दुपारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com