५ हजाराची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – प्लॉटचा फेरफार मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपायांची लाच स्विकारणाऱ्या बीड तहसिल कार्यालयातील लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पठाण इद्रीसखान मुस्ताक खान (वय-३६) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. खान याने खासगी इसम अशोक गंगाधर शेजवळ (वय-४६) याच्या मार्फत लाच स्विकारली. ही कारवाई आज (मंगळवार) शेजवळ याच्या शिवाजीनगर येथील राहत्या घरामध्ये करण्यात आली.

तक्रारदार यांच्या मुलीच्या नावे बीड तालुक्यातील मौजे पाली येथे प्लॉट आहे. या प्लॉटचा फेरफार मंजूर करुन देण्यासाठी तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपीक खान याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रादाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.५) तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता खान याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागणी केली. तसेच ही रक्कम खासगी इसम अशोक शेजवळ याच्याकडे देण्यास सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (मंगळवार) अशोक शेजवळ याच्या शिवाजीनगर येथील घराजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारताना शेजवळ याला रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच लिपीक इद्रीसखान याला तहसिल कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक हनपुडे पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –