45000 हजार रुपयाच्या लाच प्रकरणी पुण्यातील वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी आणि दुसऱ्या गुन्ह्यात अटक होऊ न देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून 45 हजार रुपये स्विकारताना पुण्यातील वकीलाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या वकीलाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज उर्फ जाफर आयुब मुलानी (वय-29) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वकीलाचे नाव आहे. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि.21) तक्रार केली होती. त्यानुसार आज (गुरुवार) पथकाने सापळा रचून मुलानी याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात भादवि कलम 420, 466 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांच्या भावास अटक करण्यात आली आहे. जाफर मुलानी यांनी त्या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यास सांगून भावाचा जामीन लवकर मिळवून देतो व गुन्ह्यातून 169 कलम वगळण्यास सांगतो, तसेच दुसऱ्या गुन्ह्यात अटक होऊन देत नाही. त्यासाठी तपासी अंमलदार यांना एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी जाफर मुलानी याने 45 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले होते. आज सापळा रचून पंचेचाळीस हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना जाफर मुलानी याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासी अधिकाऱ्याचा यामध्ये काही सहभाग आहे का याचा तपास केला असता यामध्ये तपासी अधिकाऱ्याचा यामध्ये सहभाग नसल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय भापकर पोलीस कॉन्स्टेबल कुऱ्हे , पोलीस कॉन्स्टेबल थरकार, पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा तुपे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अभिजित राऊत यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like