2000 रुपयाची लाच घेताना न्यायालयाचा क्लार्क अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निकालाची साक्षांकित प्रत देण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच घेताना शिवडी कोर्टाच्या 56 व्या न्यायालयातील क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज न्यायालयाच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे न्यायालयात खळबळ उडाली आहे. जयेश विनायक अडांगळे (वय-33) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या क्लार्कचे नाव आहे.

तक्रारदार यांच्यावर शिवडी महानगर दंडाधिकारी 56 वे न्यायालयात एनआय कायदा कलम 138 अन्वये खटला सुरु होता. या खटल्याची सुनावणी होऊन त्याच्या निकालाची साक्षांकित प्रत देण्यासाठी तक्रारदाराने जयेशकडे मागणी केली. त्यावेळी जयेशने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता जयेश अडांगळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. जयेश याला तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/