पोलिसाकडूनच ३० हजाराची लाच मागणारा DCP कार्यालयातील व. लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदार पोलिसाला प्रतिनियुक्‍तीवरून मुळ नियुक्‍तीच्या ठिकाणी ऑर्डर करून देण्यासाठी 30 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपायुक्‍त कार्यालयातील वरिष्ठ लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकला आहे. लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपीकाविरूध्द खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास रामचंद्र काळे (44, पोलिस उपायुक्‍त कार्यालय परिमंडळ-3, कल्याण, जि. ठाणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ लिपीक सुहास काळे यांनी तक्रारदार पोलिसाची प्रतिनियुक्‍तीवरून मुळ नियुक्‍तीच्या ठिकाणी ऑर्डर करून देण्यासाठी 30 हजार रूपयाच्या लाचेची दि. 2 मे रोजी मागणी केली होती.

लाच मागणीबाबत तक्रारदार पोलिसाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची दि. 3 मे राजी अ‍ॅन्टी करप्शनकडून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सुहास काळे हे लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्‍न झाले होते. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज (दि. 17 जून) खडकपाडा पोलिस ठाण्यात सुहास काळे यांच्याविरूध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्‍त कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरूध्द 30 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.