APIकडून 3 हजाराची लाच घेणारा पुणे पोलिस आयुक्‍तालयातील वरिष्ठ लिपीक ACBच्या जाळ्यात

पुणे पोलिस आयुक्‍तालयातील दिवसभरातील अ‍ॅन्टी करप्शनचा 2 रा ट्रॅप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलिस दलात आज (गुरूवार) दोन अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप झाले आहेत. पहिला ट्रॅपमध्ये वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली आहे तर दुसरा ट्रॅप शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात झाला. एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 3 हजार रूपयाची लाच घेताना वरिष्ठ लिपीकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

मनोज हरी काळे (52) असे लाच घेणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. काळे हे पुणे पोलिस आयुक्‍तालयातील आस्थापना शाखेत कार्यरत असुन ते शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातुन कामकाज करतात. त्यांनी एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडे लाचेची मागणी केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षकाने त्याबाबतची तक्रार अ‍ॅन्टी करप्शनला दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज (गुरूवार) अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी वरिष्ठ लिपीक मनोज हरी काळे यांनी सरकारी पंचासमक्ष 3 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. दिवसभरातील हा अ‍ॅन्टी करप्शनचा पुण्यातील दुसरा ट्रॅप आहे. त्यामुळे संपुर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गुरूवारी सकाळी तक्रारदाराविरूध्द कारवाई न करण्यासाठी 15 हजाराच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार निसार मेहमुद खान (44, बक्‍कल नं. 2647) आणि खासगी व्यक्‍ती मेहंदि अजगर शेख (32, रा. हडपसर) यांना रंगेहाथ पकडले होते. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिस आयुक्‍तालयात ‘बाबु’गिरी जोरात
अलिकडील काळात पुणे पोलिस आयुक्‍तालयातील ‘बाबु’गिरी जोरदार ‘खाबु’गिरी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांकडून मोठया प्रमाणावर ‘मलिदा’ घेवुन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कामकाज करणारे काही ‘बाबु’ लोक सध्या सक्रिय झाल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, सर्वसाधारण बदल्या ज्या वेळी होतात त्यावेळी तर काही ‘बाबु’ लोकांचे ‘भाव’ ठरलेले आहेत. काही ठराविक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी सलगी करून ‘बाबु’गिरी जोरात चालविण्याचा गोरख धंद्याच काही बाबु लोकांची चालविल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आगामी मे आणि जून महिन्यात याच ‘बाबु’ लोकांची मनधरणी करण्याची वेळ पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पोलिस निरीक्षक तसेच पोलिस कर्मचार्‍यांवर येते. मनोज काळे यांना लाच घेताना अटक केल्यामुळे ‘बाबु’ लोकांच्या ‘खाबु’गिरीला चाप बसणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, त्याचे उत्‍तर आगामी काही महिन्यात मिळणार आहे. दरम्यान, काही अति वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील त्यांच्या जवळील काही ‘बाबु’ लोकांचे ऐकून बदल्या करतात अशी काही उदाहरणे देखील यापुर्वीच्या काळात झालेली आहेत. काही वरिष्ठ अधिकारी तर ‘बाबु’ लोकांकडून ‘समाधान’ झाल्याशिवाय फाईलवर स्वाक्षरी करीत नाहीत अशी माहिती पोलिस दलातील सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आगामी मे आणि जून महिन्यात पुणे पोलिस आयुक्‍तालयात प्रचंड मोठया घडामोडी होणार असुन मे महिन्यात काही बोटावर मोजण्याइतपत वरिष्ठ अधिकारी सक्रिय होतात. आगामी काळात आयुक्‍तालयातील ‘बाबु’ लोकांची ‘खाबु’गिरी चालु राहणार का त्याला चाप बसणार हे आगामी काळात सर्वांना समजणारच आहे.