वेल्हे तालुक्यातील पाल गावचा ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – वेल्हे तालुक्यातील पाल गावच्या ग्रामसेवकास 13 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. पंतप्रधान आवास योजनेमार्फत घरबांधणीचे अनुदान देण्यासाठी लाच घेतली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

श्रीनिवास शंकरराव माने (वय 34) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

माने हा वेल्हा तालुक्यातील पाल (बुद्रुक) गावचा ग्रामसेवक आहे. दरम्यान, यातील 29 वर्षीय तक्रारदाराने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी ग्रामपंचायत यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये अनुदान मंजूर केले होते. त्यापैकी 15 हजार रुपये तक्रारदार यांना देण्यात आले होते. उर्वरित 1 लाख 5 हजार रुपये देणे बाकी होते. दुसर्‍या टप्प्यातील 45 हजार रुपये त्यांना द्यायचे होते. ही रक्कम देण्यासाठी ग्रामसेवक याने त्यांच्याकडे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी ग्रामसेवक माने याला तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून 13 हजार रुपायंची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.