पगार काढण्यासाठी 2 हजार रुपये लाच मागणारा मुख्याध्यापक आणि लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – 2018 मधील थकित अर्जित पगार अदा करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील केंद्रीय मुख्याध्यापक व गट साधन केंद्रातील लिपिकाला एसीबीच्या पथकाने सकाळी 11 वाजता सापळा रचून माजलगाव येथे बेड्या ठोकल्या. या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.

शिक्षणाच्या आईचा घो करत तालुक्यातील शिक्षण विभागातील काही कर्मचारी शिक्षक विभागाला काळिमा फासण्याचे काम करत आहेत. गलेलठ्ठ पगार असूनही आपली पैशाची भूक न शमणाऱ्या येथील केंद्रीय मुख्याध्यापक श्यामसुंदर दासरे व गट साधन केंद्रातील लिपिक काशिनाथ गोगुलवार यांनी संगनमताने आपल्याच विभागातील शिक्षकाला पगार काढण्यासाठी व रजा मान्य करण्यासाठी वेटीस धरण्याचा प्रकार घडला.

हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून या विभागात सर्रास सुरू होता. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तर कधी इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली या जोडगोळी कडून येथील शिक्षकांना लुटण्याचे काम या दोघांकडून केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. याविरोधात आवाज उठवण्याचे काम एका शिक्षकाने करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या घटनेची माहिती तीन दिवसांपूर्वी दिली होती. याची शहानिशा एसीबी पथकाचे डीवायएसपी यांनी परवा करून शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी अकरा वाजता माजलगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापक श्यामसुंदर दासरे व गट साधन केंद्रातील लिपिक काशिनाथ गोगुलवार यांना सापळा रचून रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पार पाडली. सदरील कारवाईने शिक्षणक्षेत्रात माजलेला सावळागोंधळ यानिमित्ताने उघडा पडला असून सर्वत्र खळबळ माजली आहे.