2000 रुपयांची लाच स्विकारताना महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह 2 जण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील वीज मिटर बदलून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (बुधवार) केली. याप्रकरणी जळगाव येथील ४९ वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. कनिष्ठ अभियंता दिपक केशव पाटील (वय-32), खासगी इसम निलेश दामु जाधव (वय-25), खाजगी कॉन्ट्रॅक्टर नितीन गोविंदा परदेशी (वय-29) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचे घरगुती विद्युत मिटर जळाल्याने त्यांना मिटर बदलून नवीन विद्युत मिटर मिळण्यासाठी अर्ज केला होता. नवीन मिटर देण्यासाठी महावितरणचा कनिष्ठ अभियंता दिपक पाटील याने खासगी इसम निलेश जाधव याच्या मार्फत दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता दिपक पाटील याने खासगी इसमामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून खासगी इसम निलेश जाधव आणि त्याला मदत करणारा खासगी कॉन्ट्रॅक्टर यांना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक जी.एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस नाईक मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –