15000 रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह 2 कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नालासोपारा : पोलीसनामा ऑनालाइन – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी महिलेकडून 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना वसई विरार महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीच्या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.16) दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे महानगरपालिकेच्या विभागांमध्ये खळबळ माजली आहे. लाचखोरांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कनिष्ठ अभियंता योगेश रविकांत सावंत (वय-49), ठेका कर्मचारी गोरख सदगीर (वय-29), नारायण अंकुश देसाई (वय-28) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार महिलेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी योगेश आणि गोरख यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 15 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. सोमवारी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी वलीव प्रभागातील नवजीवन येथील बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी दोघांच्या वतीने नारायण याला दुपारी पावणे चारच्या सुमारास 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी, पोलीस नाईक गोसावी, पवार, महिला पोलीस नाईक जोंधळे, पोलीस शिपाई पवार, त्रिभुवन यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

You might also like