40 हजाराची लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विजमिटर बसवून पुन्हा विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्विकारताना नाशिक महावितरण विभागातील हौसिंग कॉलनी शाखेतील सहाय्यक अभियंत्यासह एका खासगी इसमाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मालेगाव येथील जुना आग्रारोडवरील प्रकाश फर्टिलायझरच्या मोकळ्या जागेत करण्यात आली. विकास सुभाष गायकवाड असे सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. तर मोहंमद इस्माइल मोहंमद युसूफ असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदारय यांचे पावरलूमचे काढलेले विजमिटर पुन्हा बसवून लाईट सुरु करण्यासाठी विकास गायकवाड याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 40 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी मालेगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (दि.19) तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता गायवाड याने खासगी इसम मोहंमद युसूफ याच्याकडे रक्कम देण्यास सांगितले. लाचेची रक्कम आज जुना आग्रारोडवरील प्रकाश फर्टिलायझरच्या मोकळ्या जागेत लाचेची 40 हजार रुपयांची रक्कम स्विकारताना युसुफ याला रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com