महिलेकडून 50000 रुपयांची लाच घेताना सिडकोचा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रुम ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयातील सहायक वसाहत अधिकारी आणि खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार महिलेने रविवारी (दि. 1) याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार आज (सोमवार) सहायक अधिकारी आणि खासगी एजंटला लाच घेताना सापळा रचून रंगेहाथ पकडले.

सहायक वसाहत अधिकारी सागर मदनलालजी तापडिया (वय, 47) आणि खासगी एजंट रवींद्र हुकमीचंद छाजेड (वय, 54) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार महिलेने रुम ट्रान्सफर करण्यासाठी सिडको कार्यालयात अर्ज केला होता. रुम ट्रान्सफर करण्यासाठी सिडको कार्यालयातील सहायक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी खासगी एजंट छाजेड याने 50 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रविवारी तक्रार केली. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता खासगी एजंट छाजेड याने तापडीया यांच्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

लाचलुचपत अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) पनवेल येथील सिडको कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदार महिलेकडून सिडको कार्यालयात लाच स्विकारताना खासगी एजंट छाडेड याला रंगेहाथ पकडले. तसेच सिडकोचा अधिकारी तापडीया याला खासगी व्यक्तीकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तापडीया आणि छाजेड दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com