25000 रुपयाची लाच घेताना अन्न सुरक्षा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे ठेवलेली सुपारी आणि तंबाखू पकडल्यानंतर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने 1 लाख 50 हजार रुपयाची मागणी केली. कारवाईच्या दिवशी 75 हजार रुपये घेऊन उर्वरीत रक्कमेपैकी 25 हजार रुपयाची लाच घेताना अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला आज सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सतीश हाके असे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे अन्न व प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय व्यापाऱ्याने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.9) तक्रार दिली. तक्रारदार यांचा बेकायदेशीर तंबाखू व सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे. सतीश हाके याने 6 मार्च रोजी तक्रारदार यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी बेकायदेशीरपणे ठेवलेली 50 हजार रुपये किंमतीची तंबाखू आणि सुपारी पकडण्यात आली. त्यावेळी तक्रारदार यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी सतीश हाके याने 1 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी 75 हजार रुपये हाके याला दिले होते.

तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यावेळी उर्वरीत रक्कमेपैकी 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार आज सांगली येथील अन्न व प्रशासन विभागाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपयाची लाच घेताना सतीश हाके याला रंगेहाथ पकडण्यात आले. हाके याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक प्रशांत ताटे, विनोद राजे, पोलीस शिपाई विशाल खरता, नीलेश वाईदंडे यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.