सांगली : मंडल अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पलूस तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदारास खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. मंडल अधिकारी सैपन हसन जातगार यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली येथे पलूस येथील खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी पलूस येथील मंडल अधिकरी सैपन जतगार यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार पलूस येथील एका व्यक्तीने केली होती. त्या इसमाने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता, त्यामध्ये मंडल अधिकारी जातगार यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम १० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज लाचलुचपत विभागाने पलूस तहसीलदार कार्यालय येथे सापळा लावला असता मंडल अधिकरी सैपन हसन जातगार ( वय ४९ ) यांनी लाचेची मागणी करून ती त्यांचे साथीदार युवराज बाळासो जाधव ( वय ३६ ) यांच्यामार्फत लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सैपन जातगार आणि युवराज जाधव यांच्या विरोधात पलूस पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, जितेंद्र काळे यांच्या पथकाने केली आहे.

You might also like