3000 हजार रुपयाची लाच घेताना तहसिल कार्यालयातील ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

केडगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय दाखले तहसिलदार कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी 3 हजार रुपयाची लाच घेताना तहसिलदार कार्यालयातील डाटा ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.21) केडगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली. आनंद विनायक कोरे (वय-35) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या डाटा ऑपरेटरचे नाव आहे.

तक्रारदार यांचे वांगी गावामध्ये दिशा महा ई सेवा केंद्र आहे. महा ई सेवा केंद्रामध्ये येणाऱ्या ग्राहकांचे शासकीय दाखले तहसिदार कार्यालयातून मंजूर करून देण्याकरिता कोरे याने तक्रारदार यांच्याकडे दरमहा एक हजार रुपयांची मागणी केली होती. मागील दोन महिन्याचे दोन हजार रुपयांची मागणी कोरे याने तक्रारदार यांच्याकडे केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज केडगाव तहसिलदार कार्यालयात आनंद कोरे याला तक्रारदार यांच्याकडून मागील दोन महिन्याचे दोन हजार आणि चालू महिन्याचे एक हजार असे एकूण तीन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आनंद कोरे याच्याविरोधात केडगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, पोलीस उप अधीक्षक अधिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, भास्कर भोरे, जितेंद्र काळे, रविंद्र धुमाळ, संजय संकपाळ, राधिका माने, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा –