अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई : एलसीबी पीआय, एपीआय आणि कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन- नवीन वर्षाच्या सुरवातीलाच अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पोलिस दलातील लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या आणि इतर दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमरावती विभागाच्या अखत्यारित असलेल्या यवतमाळ जिल्हयात अमरावतीच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने मोठी कारवाई केली आहे. 25 लाखाच्या लाचेची मागणी करून 5 लाखाची लाच स्विकारल्याप्ररकणी स्थानिक गुन्हे शाखेच्या  वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अमरावती विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (48), सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप प्रभाकर चव्हाण (36) आणि सुनिल विठ्ठल बोटरे (40) यांना अटक करण्यात आली आहे.  निरीक्षक मुकूंद कुलकर्णी हे यवतमाळ पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) कार्यरत आहेत. तक्रारदाराने कुलकर्णी, चव्हाण आणि पोलिस कर्मचार्‍याने 25 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अमरावती विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचा आदेश दिला.

अमरावती विभागातील तसेच यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस अधीकार्‍यांनी सापळा रचला. मागणी केलेल्यापैकी 5 लाख रूपये स्विकारताना सरकारी पंचासमक्ष कारवाई करण्यात आली आहे. पोलिस नाईक सुनिल बोटरेे यांनी 5 लाच स्विकारले. वर्षाच्या सुरवातीलाच अशा प्रकारची मोठी कारवाई झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. काही दिवसांपुर्वीच मुंबई येथे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना 22 लाखाच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाला काही दिवस होण्यापुर्वीच पुन्हा एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक  पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शासकीय लोकसवेकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा अन्यथा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक पंजाबराव डोंगरदिले, पोलिस उपाधीक्षक गजानन पडघन, कर्मचारी श्रीकृष्ण तालन, सुनिल वराडे, चंद्रकांत जनबंधू, अभय वाघ, महेंद्र साखरे, शैलेश कडू यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारणासाठी घेतली लाच :-
तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास तकलादू करून, कमजोर चार्जशीट तयार करणे, जप्‍त असलेला माल सोडणे, अधिक माल जप्‍त न करणे, तसेच दाखल गुन्हयातील कलमे कमी करणे आणि तक्रारदाराच्या भावाकडून घेतलेली शेतीची खरेदी, चेक्स, परत करण्यासाठी लाच घेण्यात आली आहे.