पुणे शहर पोलिस दलात आठवडयातील 3 रा अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप ; हवालदाराला 2 हजाराची लाच घेताना पकडले

लाचखोर हवालदार येरवडा पोलिस ठाण्यातील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलिस दलात आठवडयात 3 अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप झाले आहेत. मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्याकरिता 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 2 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आठवडयाभरातील 3 अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, दि. 25 एप्रिल रोजी अ‍ॅन्टी करप्शनचे दोन ट्रॅप पुणे पोलिस आयुक्‍तालयात झाले होते. त्यानंतर पोलिस आयुक्‍तांनी काही वरिष्ठ अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यानंतर 5 व्याच दिवशी पुन्हा एकदा अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप झाल्याने खळबळ उडाली आहे.

करीम मोहम्मद शरीफ शेख (47, पोलिस हवालदार बक्‍कल नंबर 5309, येरवडा पोलिस स्टेशन) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय युवकाने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करूनच ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्यासाठी पोलिस हवालदार करीम शेख यांनी त्यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. 2 हजार रूपयांवर तडजोड झाली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला. त्यावेळी पोलिस हवालदार करीम शेख यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपाधीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलिस निरीक्षक राजू चव्हाण, पोलिस हवालदार शेळके आणि पोलिस कर्मचारी अभिजीत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आठवडयाभरात सलग 3 अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप झाल्याने संपुर्ण शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्‍तांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना दि. 26 एप्रिल रोजी बोलावुन दि. 25 एप्रिल रोजी झालेल्या 2 अ‍ॅन्टी करप्शनच्या ट्रॅपचा जाब विचारला होता. पोलिस आयुक्‍तांनी तंबी दिल्यानंतर देखील येरवडा पोलिसांची खाबुगिरी थांबलेली नसल्याचे अ‍ॅन्टी करप्शनच्या झालेल्या या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या 6 दिवसात पुणे पोलिस आयुक्‍तालयात झालेले अ‍ॅन्टी करप्शनचे ट्रॅप :-

दि. 25 एप्रिल : – वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार निसार मेहमुद खान (44) यांना आणि एका खासगी व्यक्‍तीला 5 हजाराची लाच धेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

दि. 25 एप्रिल :- आयुक्‍तालयाच्या आस्थापना शाखेतील वरिष्ठ लिपीक मनोज हरी काळे (52) यांना एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 3 हजार रूपयाची लाच घेताना शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले होते.

दि. 30 एप्रिल :- येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार करीम मोहम्मद शरीफ शेख (47) यांना 2 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like