DJ ची परवानगी देण्यासाठी 22 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह सहाय्यक उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सुला वाईन, नाशिक म्युझिक इव्हेंटसाठी साऊंड सिस्टीमची परवानगी देण्यासाठी 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 22 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

पोलिस निरीक्षक नानासाहेब रामकिशन नागदरे आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे (दोघे नेमणुकीस नाशिक तालुका पोलिस स्टेशन, जि. नाशिक) अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत. तक्रारदारांनी दि. 7 डिसेंबर रोजी सुला वाईन, नाशिक म्युझिक इव्हेंटसाठी साऊंड सिस्टीमची परवानगी त्यांच्याकडे मागितली होती. दि. 4 डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली तर दि. 5 डिसेंबर रोजी सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष देवरे यांनी त्यांच्याकडे 9 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आज (गुरूवार, दि. 5 डिसेंबर) सापळा रचला असता पोलिस निरीक्षक नागदरे आणि सहाय्यक उपनिरीक्षक देवरे यांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात 22 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना तात्काळ रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकास आणि सहाय्यक उपनिरीक्षकास 22 हजाराच्या लाच प्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आल्याने संपुर्ण नाशिक जिल्हयात खळबळ उडाली आहे.