सराईत गुन्हेगाराकडून 10 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच एमपीडीएनुसार कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना वडाळा येथील टी.टी. पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मुंबई एसीबीने रंगेहात पकडले. सराईताकडून पोलीस निरीक्षकांना लाच घेताना पकडल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत जाधव (वय 57) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत जाधव हे वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान, यातील तक्रारदार हा पोलीसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात त्याला अटकही केली होती. तो जामीनावर नुकताच बाहेर आला होता. दरम्यान, जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच एमपीडीएनुसार कारवाई न करण्यासाठी लोकसेवक चंद्रकांत जाधव यांनी त्याच्याकडे 70 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. यामुळे त्यांनी याबाबत तक्रारदार यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागिल्याचे निष्पन्न  झाले. तर, तक्रारदार यांनी 70 हजाराची तडजोड होत नसून, ती दोन दिवसांनी करतो. तोपर्यंत 10 हजार घ्यावे, असे सांगितले. त्यावेळी जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

गुन्हेगारांकडूनच पोलीस आता कारवाई न करण्यासाठी लाच घेऊ लागल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –