ACB चा पोलीस निरीक्षकच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लाचलुचप प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी दोन लाख आणि नंतर 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून ‘कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कुणाकडे’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे यांच्यावर नागपूर शहर पोलीस ठाण्यात आज (मंगळवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेने नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल काल (सोमवार) नागपूर कार्यालयाला मिळाला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून आरोपी पोलीस निरीक्षक पंकज उकंडे फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार महिला यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर सापळा कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पकंज उकंडे हे करीत होते. उकंडे यांनी तक्रारदार महिलेला सह आरोपी न करण्यासाठी दोन लाख आणि सापळ्याच्या गुन्ह्यातील अटक आरोपीची पोलीस कोठडी रिमांड न वाढवण्यासाठी 50 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नसताना त्यांना त्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी आणि त्यांचेविरुद्ध विभागीय कार्य़वाहीचा प्रस्ताव न पाठवण्यासाठी पंकज उकंडे यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी नागपूर कार्य़ालयात पंकज उकंडे विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावर चौकशी करून त्याचा बाबतचा अहवाल मुंबई मुख्य कार्यालयास पाठवण्यात आला होता.
मुंबई मुख्य कार्यालयातून सोमवारी (दि.23) नागपूर कार्यालयास पंकज उकंडे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आज पंकज उकंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी उकंडे राहात असलेल्या त्रिमुर्तीनगर रिंग रोड नागपूर येथील राहत्या घराची झडती घेतली. मात्र, आरोपी उकंडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारावाई पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलीस उप अधीक्षक मिलींद तोंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गजानन गाडगे, मोनोज कारनकर, चालक पोलीस शिपाई विकास गडेलवार यांनी केली.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/