4000 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून लाच स्विकारताना हर्सूल पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी हर्सूल पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली. सतीश यशवंतराव जाधव असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारादार यांच्याविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल झाला आहे. हा अर्ज चौकशीसाठी पोलस हवालदार सतीश जाधव यांच्याकडे होता. जाधव यांनी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यावेळी जाधव यांनी तुझ्याविरोधात आलेल्या अर्जाची अधिक चौकशी न करता अर्ज निकाली कढण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता जाधव याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हर्सूल पोलीस ठाण्यात सापळा रचून पोलीस हवालदार सतीश जाधव याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.