5000 रुपयाची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीवर कारवाई करून प्रकरण तहसील कार्यालयात पाठवण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) शेतकऱ्याच्या घरामध्ये करण्यात आली. अशोक शंकर पळसपगार असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार शेतकऱ्याने त्याच्या शेजारच्या शेतातून बैलगाडी नेली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. याची तक्रार वरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करून प्रकरण तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी पोलीस कर्मचारी पळसपगार याने शेतकऱ्याच्या घरी येऊन पैसे घेण्याचे कबुल केले. त्यानुसार पथकाने आज शेतकऱ्याच्या घराजवळ सापळा रचून पळसपगार याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही करावाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक पी.डी. डोंगरदिवे यांच्या मार्गदार्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र जेथे यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.