15000 ची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वाळू वाहतूकदाराकडून 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 23 जानेवारी रोजी पैसे मागितले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्याला आज सकाळी नाशिक येथील पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महेश अर्जुन आव्हाड ( वय-30, नेमणूक : पारनेर पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर) हे अटक केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराचे नावावर असलेले टिपर वाहनास पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतून वाळू वाहतूक करण्याची परवानगी देऊन, केस न करण्यासाठी पोलीस कर्मचारी आव्हाडने पंचासमक्ष 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच मागणीची पडताळणी केल्यानंतर आज सकाळी पोलीस कर्मचारी महेश आव्हाड यास अटक केली आहे.

याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी महेश आव्हाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पारनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.