5000 रुपयाची लाच घेताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

चांदवड/नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेताना पोलीस हवालदाराला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (दि.23) चांदवड पोलीस ठाण्यात करण्यात करण्यात आली या कारवाईमुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. अशोक सुखदेव फुलमाळी असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार याच्यावर नाशिक ग्रामीणमधील चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी अशोक फुलमाळी यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता फुलमाळी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज चांदवड पोलीस ठाण्यात सापळा रचून अशोक फुलमाळी यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अशोक फुलमाळी यांच्यावर चांदवड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.