मुंबईतील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास व त्यांच्या मुलाला 2 लाख रुपये व 2 साड्याची लाच घेताना ACB नं पकडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व मुंबईतील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास व त्यांच्या मुलाला 2 लाख रुपये व 2 साड्याची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांने पैश्यासोबत दोन साड्या लाच म्हणून घेतल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

भरत महादू काकड (वय 57, क्लास 1) व मुलगा सचिन भरत काकड (वय 32) असे रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काकड हे उपनिबंधक सहकारी संस्था पी. विभाग कांदविली पूर्व विभागात नोकरीस आहेत. ते क्लासवन अधिकारी आहेत. यातील तक्रारदार हे मालाड परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांना इमारतीच्या दुरुस्तीसाठी सोसायटीचा सिकिंग फंड वापरता यावा म्हणून त्यांनी अर्ज केला होता. या अर्जाला परवानगी देण्यासाठी लोकसेवक काकड यांनी त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. पण तक्रारदार यांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही.

त्यावेळी लोकसेवक काकड यांनी सोसायटीचे सेक्रेटरी यांना डिफॉल्ट ठरवून कमिटी बरखास्त करण्याची नोटीस बजावली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी काकड यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी काकड यांनी पुन्हा 2 लाख व 2 साड्या लाच म्हणून मागितली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीने रचलेल्या सापळा कारवाईत भरत काकड आणि त्यांच्या मुलाला लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

You might also like