Lockdown : संचारबंदी दरम्यान लाचखोरी ! 1,00,000 ची लाच घेताना उप अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात आणि राज्यात कोरोनामुळे नागरिक स्त्रस्त झाले आहेत. केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून कोरोनाविरुद्ध लढा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. अशा संचारबंदीच्या काळात एका कॉन्टॅक्टर कडून 1 लाख रुपयाची लाच स्विकारताना औरंगाबाद येथील बांधकाम विभागातील उप अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीराम बाबुराव बिरारे (वय-59 रा. मनीषा कॉलनी, जिल्हा न्यायालयच्या पाठीमागे, औरंगाबाद) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय कॉन्टॅक्टरने औरंगाबाद लाचलुचपत विभागाकडे सोमवारी (दि.30) तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभगाने मंगळवारी (दि.31) ही कारवाई केली.

तक्रारदार हे कॉन्टॅक्टर असून त्यांच्या कामाची बिलं काढण्यासाठी उप अभियंता श्रीराम बिरारे याने 1 लाख 25 हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्य एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता बिरारे याना तक्ररादाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचून श्रीराम बिरारे याला तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपयाची

लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई औरंगाबाद विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे, पोलीस नाईक संतोष जोशी, विजय बाम्हंदे, सुनील पाटील, महिला पोलीस नाईक दराडे, पोलीस शिपाई व्ही. टी. चव्हाण, सी.एन बागुल यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.