1 लाख रूपयाची लाच घेताना तहसीलदार, एक वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कुळ जमीन प्रकरणामध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख रूपयाची लाच स्विकारणार्‍या औरंगाबाद जिल्हयातील पैठणच्या तहसीलदाराला आणि एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी रंगेहाथ पकडले आहे. चक्‍क तहसीलदार एवढया मोठया रक्‍कमेची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

महेश सावंत असे लाच घेणार्‍या तहसीलदाराचे नाव आहे. अ‍ॅन्टी करप्शनने ताब्यात घेण्यात आलेल्या वकिलाचे नाव अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी तक्रारदाराने औरंगाबादच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे त्यांची तक्रार केली होती. तक्रारदाराचे कुळ जमीनीचे काम तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे होते. सावंत यांनी तक्रारदारास मदत करण्यासाठी 30 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 1 लाख रूपये लाच देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदाराकडून प्राप्‍त झालेल्या तक्रारीची अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पडताळणी केली. त्यामध्ये सावंत यांच्याकडून मोठया रक्‍कमेची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष तहसीलदार सावंत यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्‍कम स्विकारली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने महेश सावंत यांना ताब्यात घेतले. चक्‍क तहसीलदारानेच एवढया मोठया प्रमाणावर लाच घेतल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनचे एक पथक महेश सावंत यांच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले आहे. अधिक तपास औरंगाबादचे अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.

Visit : Policenama.com