2000 रुपयाची लाच घेताना तलाठी अ‍ॅंन्टी करप्शनच्या जाळ्यात

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या वाटणीप्रमाणे सातबारा उतारा व फेरफार देण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच घेताना रिसोड तालुक्यातील पेडगांव चिखली येथील तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले. मुगुटराव कुंडलीकराव जाधव (वय-51) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई जाधव यांच्या रिसोड येथील साईग्रीन पार्क मधील राहत्या घरात आज करण्यात आली.

याप्रकरणी वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली. तक्रारदार व त्यांच्या चुलत भावांचे नावे पेडगाव शिवरात एकत्रीत शेतजमीन आहे. जमीनीची वाटणी झाली असून वाटणीपत्रानुसार जमीन वेगवेगळी करण्यात आली आहे. या जमिनीच्या वाटणीपत्रानुसार फेरफार व सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी जाधव याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने शुक्रवारी (दि.14) पडताळणी केली. पडताळणीमध्ये तलाठी जाधव याने रिसोड येथील त्याच्या राहत्या घरी लाच घेण्याचे कबुल केले. त्यानुसार आज सापळा रचून तलाठी जाधव याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई अमरावती लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, वाशिम लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल इंगोले, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन टवलारकर, शेख आसिफ, पोलीस नाईक सुनिल मुंदे, अरविंद राठोड यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल इंगोले करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.