जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  – बेकायदा वाळु वाहतूक करताना जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी (वय ४६, रा. तलाठी, वर्ग ३, सजा लाख, ता़ राहुरी, जि़. नगर, रा. मुसळवाडी ता. राहुरी, जि़ नगर) असे या तलाठ्याचे नाव आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील ३८ वर्षाच्या तक्रारदार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर वाळु वाहतुक करताना तलाठी परुशराम सूर्यवंशी यांनी २ ऑगस्ट २०१९ रोजी पकडला होता. त्यानंतर तो राहुरी तहसील आवारात लावण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी सूर्यवंशी यांनी १४ फेब्रुवारीला ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लचुपत प्रतिंबधक विभागाकडे धाव घेतली.

लाचेच्या पडताळणीत सूर्यवंशी यांनी तडजोड करुन २० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी प्रवरा नदी किनाऱ्यावरील जातप गावाच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना सूर्यवंशी यांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक कराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.