८ हजार रुपयांची लाच स्विकरणारा वाहतूक नियंत्रक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळातील चालकास निलंबीत करण्याची धमकी देऊन ८ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या वाहतूक नियंत्रकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) नंदूरबार एसटी डेपोजवळ करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

नंदकिशोर वसंत शेवाळे (वय- ४१ रा. वाघेश्वरी मंदिराजवळ, विमल हौसिंग सोसायटी, नंदूरबार) असे वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय चालकाने तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे नंदूरबार एसटी डेपो येथे चालक या पदावर काम करतात. त्यांनी १९ मे रोजी एक दिवसाची किरकोळ रजा घेतली होती. तक्रारदार यांची रजा मंजूर असताना ही शेवाळे याने तुम्ही गैरहजर राहिलात. त्यामुळे तुम्हाला निलंबीत करण्यात येईल अशी धमकी दिली. निलंबन टाळण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये ८ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याची तक्रार नंदूरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाच्या अधिका-यांनी आज पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी शेवाळे याने एसटी डेपोच्या जवळ लाच स्विकारण्याचे कबुल केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एसटी डेपोजवळ सापळा रचला. शेवाळे याला ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नंदूरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदार्शनाखाली पोलीस निरीक्षक करूनाशील तायडे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.