42 हजाराच्या लाच प्रकरणी सहाय्यक निरीक्षकासह सहाय्यक उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ढोकी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्हयात (एनसी) गैर अर्जदारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी 42 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक गोत्यात आले आहेत. त्यांच्यावर उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल केला असुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत धनसिंग जाधव (48) आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोतीराम गणपत कवठे (52) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलिस ठाण्यात एक तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (एनसी) केला होता. त्यामधील गैर अर्जदारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांनी 40 हजार तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोतीराम कवठे यांनी तक्रारदाराकडे 2 हजार रूपयाच्या लाचेची दि. 6 मार्च रोजी मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

त्यामध्ये सहाय्यक निरीक्षक जाधव आणि कवठे हे एकुण 42 हजार रूपयाची लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) सापळा रचुन सहाय्यक निरीक्षक जाधव आणि सहाय्यक उपनिरीक्षक कवठे यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत सापळा अधिकारी म्हणुन पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी काम केले. सहाय्यक निरीक्षक जाधव आणि सहाय्यक उपनिरीक्षक कवठे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.