150000 रुपयाची लाच घेताना जात पडताळणी समितीच्या महिला उप आयुक्तासह दोघेजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून दीड लाख रुपयाची लाच घेताना यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्यासह वरिष्ठ लिपीक आणि एका खासगी व्यक्तीला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आली.

उपायुक्त जया विनोद राऊत (वय-42), वरिष्ठ लिपीक नितीन कडे, खासगी इसम सावन प्रकाश चौधरी (वय-38) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील 45 वर्षीय व्यक्तीने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारदार हे शिक्षक असून त्यांनी यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त जया राऊत आणि वरिष्ठ लिपीक नितीन कडे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी रविवारी (दि.2) अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची पडताळणी केली असता राऊत आणि कडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही लाच खासगी इसम सावन चौधरी याच्यामार्फत स्विकारण्याचे कबुल केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाने सोमवारी (दि.3) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयालयात सापळा रचून खासगी इसम सावन चौधरी याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी 15 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरीत 1 लाख 35 हजार रुपये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा बॅगेत ठेवल्या होत्या.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र जेधे, रुपाली पोहनकर, महिला पोलीस हवालदार ज्योती झाडे, पोलीस शिपाई पंकज बोरसे, शैलेश कडू, राजेश कोचे व चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश किटुकुले यांच्या पथकाने केली.