महिला तलाठी, कोतवाल 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- जमिनीची सात बार्‍यावर नोंद करण्यासाठी 50 हजाराची लाच घेणार्‍या मुळशी तालुक्यातील भूगांवच्या महिला तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

मनिषा सर्जेराव पवार (37) आणि विठ्ठल गुलाब सुर्वे (37) असे महिला तलाठी आणि कोतवालाचे नाव आहे. तक्रारदार यांचे क्षेत्र व वारसा नोंदीचे प्रकरणात तहसिलदार मुळशी यांनी दिलेल्या आदेशानुसार नांव नोंद व क्षेत्र नोंद करून सात बारा पत्रकी नोंदी घेण्यासाठी मनिषा पवार आणि विठ्ठल सुर्वे यांनी 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

प्राप्‍त झालेल्या तक्रारीची नोंद करण्यात आली. त्यामध्ये पवार आणि सुर्वे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचुन पवार आणि सुर्वे यांच्यावर कारवाई केली. शासकीय लोकसवेकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा अन्यथा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वीच मुळशीचे तहसिलदार सचिन डोंगरे यांना 1 कोटी रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनचे अटक केली होती. त्याला काही दिवस झाले तोवर महिला तलाठी आणि कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडले आहेत. महसुल विभागात लाचखोरीचे प्रचंड पेव आल्याचे होत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.