10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – थकीत वेतनाचे देयक मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना शाळेच्या मुख्याध्यापकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील श्रीराम हायस्कुलमध्ये मंगळवारी (दि.2) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. श्रीकांत बाबुराव साखरवाडे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तसेच साखरवाडे हा श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे सासरे श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. चौथ्या वेतन आयोगाचे थकबाकीचे देयक तयार करुन देणे, जुलै 1999 ते जुन 2001 चे थकीत वेतन देयक पथकाकडे पाठविणे आणि सेवा समाप्ती प्रकरणातील 2003 ते 2007 या सेवानिवृत्ती कालावधीतील काल्पनीक वेतन वाढ लावुन सेवापुस्तिका अद्ययावत करणे आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवणे यासाठी तक्रारदाराच्या सासऱ्याला पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता श्रीकांत साखरवाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी दहाच्या सुमारास देव्हाडी येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यापक साखरवाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. साखरवाडे याच्यावर लुचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कुरंजेकर, रोशनी गजभिये, सुनील हुकरे, दिनेश धार्मीक, राजेंद्र कुरुडकर, कुणाल कडव, दिपीका राठोड यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.