ऐतिहासिक कारवाई ! पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 6 पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात, राज्यात प्रचंड खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच SDPO, PI व सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 6 पोलीस लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अडकले आहेत. यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने 29 फेब्रुवारीपासून ट्रॅप लावला होता. आज (शनिवारी) लाचेचे 40 हजार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ACB चं पथक मागावर असल्याची ‘टीप’ मिळाल्यानं त्यांनी लाच स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू झाली आहे.

उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, पोलीस निरीक्षक संजय खंदाडे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले, पोलीस नाईक सुुभाष राठोड यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी मुन्ना शुक्ला आणि शेख मुनीर असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. अडीच वर्षापूर्वी संस्थेच्या वादातून उमरखेडमध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ‘मॅनेज’ करण्यासाठी 3 लाखांची लाच मागण्यात आली होती. संबंधित व्यक्तीने ACB कडे पुराव्यानिशी तक्रार केली.

यवतमाळच्या एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. ठरलेल्या प्रमाणे 3 लाखापैकी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे पंचासमक्ष आरोपींनी मान्य केले. मात्र, आपल्या मागावर ACB चं पथक असल्याची माहिती लागल्याने सापळा अयशस्वी झालं. अखेर याप्रकरणी लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, लाचेची मागणी केल्याप्रकरणी उमरखेड मध्ये मोठा ट्रॅप झाल्याची माहिती सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाली आहे.