प्रत्येकी २५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन लेखापालांविरुद्ध ‘ACB’ कडून गुन्हा दाखल

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – वेतनवाढ आणि फरकातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयातील दोन लेखापाल यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्यांनी लाच स्विकारली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लेखापालांविरुद्ध लाचलुचपत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यमध्ये एका महिला लेखापालाचा समावेश आहे.

संतोष बहादूर आमटे (वय 36), महिला लेखापाल किरण बाळू गाढे (वय 33) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लेखापालांची नावे आहेत. याप्रकरणी आदीवासी विकास महामंडळातून निवृत्त झालेल्या कनिष्ठ सहायकाने (वय-५९) यांनी नंदूरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार हे ३० डिसेंबर २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. ‘सुधारित सेवा अंतर्गत प्रगती योजना’ या योजने अंतर्गत तक्रारदार यांचे वेतनवाढ व फरकासह एकूण ११ लाख ४२ हजार ८०५ रुपयांचे बील मंजूर झाले होते. मात्र मंजूर बिलात त्रुटी होत्या. या त्रुटींची पूर्तता करून बिल पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यासाठी वर्ग ३ चे लेखापाल संतोष आमटे आणि वर्ग २ चे लेखापाल किरण गाढे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची लाच मागितली.

संतोष आमटे याने २५ हजार रुपयांच्या धनादेशाच्या स्वरूपात तर किरण गाढे यांनी रोख स्वरुपात लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, आमटे आणि गाढे यांना सापळा कारवाईची माहिती मिळाल्याने त्यांनी लाच स्विकारण्यास नकार दिला. पथकाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांवर पदाचा दुरुपयोग करून लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक