३ लाखाची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ट्रक चोरीच्या गुन्हयात तक्रारदार आणि त्यांच्या भावाचे नाव न घेण्यासाठी ७ लाखाच्या लाचेची मागणी करून ३ लाखाची लाच घेताना शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलिसाला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. हा सापळा सोमवारी यशस्वी झाला.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a8ea722-8972-11e8-9f53-e5d936c59499′]

अशोक शशिकांत गाडे (पोलीस शिपाई बक्कल क्रमांक २५८४) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. गाडे यांचा साथीदार पोलीस हवालदार अल्ताफ अहमद शेख हा फरार झाला आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात एक ट्रक चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात नाव न टाकण्यासाठी गाडे आणि शेख यांनी तक्रारदारकडे ७ लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ३ लाख ५० हजारावर गाडे आणि शेख सहमत झाले. तक्रारदाराने नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी सापळा रचला. ठरलेल्या ३ लाख ५० हजारापैकी ३ लाखाची लाच घेताना अशोक गाडे याला रंगेहात पकडण्यात आले. पोलीस हवालदार शेख फरार झाला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी पुढील तपास करीत आहेत. या लाच प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यातील आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा तपास चालू आहे. दरम्यान, पोलीस हवालदार शेख याचा शोध घेण्यात येत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांनी ३ लाखाची लाच घेतल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे.