पुणे : अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईची चाहूल लागताच पोलिस कर्मचार्‍याचे ससून रूग्णालयातुन पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन चालविण्याचा परवाना वाहन चालकाला परत देण्यासाठी 2500 रूपयाच्या लाचेची मागणी करून 2200 रूपयाची लाच स्विकारण्यासाठी ससून रूग्णालयाच्या परिसरात आलेल्या पोलिस कर्मचार्‍याने अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाची चाहुल लागल्यानंतर पलायन केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ससूनच्या परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश पुरूषोत्‍तम सवाणे (33, पोलिस नाईक, बक्‍कल नंबर 1640, पौड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सवाणे हे पौड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराचा वाहन चालविण्याचा परवाना त्यांच्या ताब्यात घेतला होता. तो परत देण्यासाठी पोलिस कर्मचारी सवाणे यांनी तक्रारदाराकडे 2500 रूपयाची मागणी केली होती. तडजोडीअंती 2200 रूपयाची लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. आज (शुक्रवारी) अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ससून रूग्णालयाच्या परिसरात सापळयाचे आयोजन केले होते. सरकारी पंच देखील हजर होते. पोलिस कर्मचारी सवाणे हे तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी परिसरात आले होते. त्यावेळी त्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाची चाहूल लागली आणि त्यांनी लागलीच लाचेच्या रक्‍कमेसह स्विफ्ट कारमधून पलायन केले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सवाणे यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
You might also like