7000 ची लाच मागणार्‍या तलाठ्यावर अखेर गुन्हा दाखल

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – सात हजारांची लाच मागणार्‍या तलाठ्यावर अखेर एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली तालुक्यातील घोटा येथील सज्जाचा तलाठी अनिलकुमार गवई हे एसीबीच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी तक्रारदाराकडे ७ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याची तलाठी गवई यांनी सहमती दर्शवली. परंतु कारवाई दरम्यान तलाठ्यास संशय आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती की घोटा येथील सज्जाचे तलाठी अनिलकुमार गवई हे केसापूर शेत शिवारातील गट क्रमांक २९१, २९२, ३०२, ३०७ मधील शेताचा त्यांचे आई व बहिणीचे हक्क सोड पत्र प्रमाणे जमिनीचा फेर तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने घेऊन तसा सातबारा बनवून देण्यासाठी ७ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ठरल्यापैकी ५ हजार रूपये देण्याचे ठरले. परंतु पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.

सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे हिंगोली शहरात २८ मे रोजी पडताळणी करण्यात आली. परंतु यावेळी तलाठी गवई यांना संशय आल्यामुळे त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास सहमती दिली नाही. त्यामुळे गवई यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोउपनि बुरकुले, पोहेका विजयकुमार उपरे, पोना संतोष दुमाने, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुढे, प्रमोद थोरात, विनोद देशमुख, अविनाश किर्तनकार आदींनी केली.