15 हजार व ‘खंबा’ मागणारा चोरगे ACB च्या जाळ्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – सील केलेले दुध सेंटर सोडविण्यासाठी अगोदर १० हजार रुपये लाच घेतल्यानंतरही भुक न भागणार्‍या आरे डेअरीतील लिपिकाने पुन्हा १५ हजार रुपये व दारुचा खंब्याची मागणी केली. ती स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.

बापू तानाजी चोरगे (वय ४५) असे अटक केलेल्या आरे सेंट्रल डेअरीतील कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हे पवई आय आय टी गेटसमोर दुध सेंटर चालवितात. १ नोव्हेंबर २०२० रोजी ते नेहमीप्रमाणे दुध सेंटरवर असताना डेअरी अधिकारी बोरसे व त्यांच्याबरोबर आणखी एक जण आला. त्यांनी तक्रारदाराला दुध सेंटरमधील फ्रिज बंद आहे व दुध सेंटरच्या बाबतीत तक्रारी आहेत, असे सांगून त्यांना दुध सेंटरच्या बाहेर काढून त्यांचे दुध सेंटर सीलबंद केले व निघुन गेले.

तक्रारदार हे दुसर्‍या दिवशी डेअरी अधिकारी बोरसे यांना कार्यालयात जाऊन भेटले. तेव्हा त्यांनी डेअरी मॅनेजर जी़ एऩ राऊत व बापू चोरगे यांना भेटायला सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार दोघांना भेटले. त्यांनी आज उद्या सील काढतो, असे सांगून दुध सेंटर उघडून दिले नाही. फेब्रुवारी २०२१ मध्ये बापू चोरगे याने त्यांच्याकडे १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी १० हजार रुपये दिले. तरीही त्यांनी दुध सेंटर उघउून दिले नाही.

त्यामुळे तक्रारदार यांनी २ मार्च रोजी त्यांची पुन्हा भेट घेतली. तेव्हा चोरगे यांनी १५ हजार रुपये व एक दारुचा खंबा घेऊन ५ मार्च रोजी भेटण्यास या, असे सांगितले. एकदा लाच दिल्यानंतरही त्यांची हाव सुटत नसल्याचे पाहून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी करताना चोरगे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना चोरगे याला रंगेहाथ पकडण्यात आले.